Wednesday, 20 August 2014

बिया फेकणारा माणूस......

Posted by Unknown

गोष्ट आहे सीताफळांच्या बिया साठवणाऱ्या एका वयस्कर माणसाची. 
अकलूज गावचा हा माणूस गेली ३० ते३५ वर्षे सीताफळांच्या बिया साठवतो. 
मुंबईला, पुण्याला कामानिमित्त जावं लागतं. तो पिशवी भरून त्याघेतो आणि जाताना घाटात गाडी थांबते तिथं तिथं दरीत फेकून देतो. 

हल्ली त्या घाटावर पाट्यांमध्ये पिकलेली सीताफळं घेऊन अनेकजण विक्रीला बसलेले असतात . 
अलीकडे या माणसानं खास त्यांच्याकडे जाऊन विचारलं , 
' कुठून आणता ही सीताफळं ?' ' तुमचे मळे आहेत का ?' ' कुठले मळे साहेब ? आम्ही गरीब माणसं . लोक घाटात शेकड्यानं बिया टाकतात . झाडं उगवलीत दरीत . सारं फुकटच . आम्ही फळं गोळा करतो . पिकवतो आणि तुम्हाला विकतो . शेकडो गरीब कुटुंब चालतात यावर इकडची .' 

त्या विक्रेत्याकडं गहिवरल्या डोळ्यानं पहात ही व्यक्ती डझनभर सीताफळं विकत घेते . 
पुन्हा बिया गोळा करून घाटात फेकण्यासाठी !
बारमाही काम करतायेईल असा हा देश . 
बिया फेकल्या तरी अमृतासमान चव असणारी फळे पिकवणारी इथली माती . 
बिया साठवून एखादा जरी घाटावरून त्या दरीमध्ये फेकणारा भेटला तरी हजारो कुटुंबांची तो सोय करून जातो .
वर वर किरकोळ वाटली तरी ही घटना अंतर्मुख करते . ही दृष्टी किती लोकांची असते ? जर प्रत्येकानं असा एखादा छंद बाळगला तर काळ बदलून जाईल .
अशा माणसांना काय व्यक्तिगत दुःख असत नाही , असं नाही . 
तोही पिंजून गेलेला असतो . 
पण अशा प्रेरणा तो दाबत नाही . तो त्या कृतीत आणतो .आपल्याला आपलं अंतर्मन कित्येकदा एखादं सत्कृत्य करायला सांगत असतं ; 
पण कितीवेळा आपण ते करतो ?
एखाद्या आंधळ्या भिकाऱ्याला काही तरी दान करावं म्हणून खिशात गेलेला हात 
कित्येकदा तसाच बाहेर येतो .

0 comments:

Post a Comment